Wednesday, 9 April 2014

(YOUR ZODIAC SIGN AND YOUR NATURE ) तुमच्या राशी तुमचा स्वभाव


तुमच्या राशी तुमचा स्वभाव

ज्योतिषशास्त्रानुसार एकूण १२ राशी आहेत. प्रत्येक राशीचा एक विशिष्ट असा स्वभाव असतो.  तुमच्या राशीनुसार तुमचा स्वभाव ठरत असतो. बारा राशींनुसार बारा स्वभावांची माणसं असतात. राशींच्या स्वभावातील समानता व विषमता जाणवण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येक राशींचा राशिस्वामी ग्रह.
१२ राशींचे स्वामी ग्रह

मेष- मंगळ   वृषभ- शुक्र    मिथुन- बुध   कर्क- चंद्र   सिंह- सूर्य,   कन्या- बुध,   
तूळ- शुक्र    वृश्चिक- मंगळ   धनू- गुरू   मकर- शनी     कुंभ- शनी    मीन- गुरू
  अशा प्रकारे १२ राशींचे सात ग्रह राशिस्वामी आहेत, त्याप्रमाणे व्यक्ति स्वभावात फरक पडत असतो.
स्वतःच्या पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असतो ती आपली जन्मरास समजली जाते व पत्रिकेतल्या पहिल्या स्थानात जी रास असते ती आपली लग्नरास असते. प्रत्येक माणसाच्या स्वभावावर बहुतेक जन्मराशीचा व काही प्रमाणात लग्नराशीचा प्रभाव असतो. राशीचा प्रभाव म्हणजे त्या राशीचा जो राशीस्वामी आहे त्या ग्रहाचा प्रभाव.
राशींचा एका शब्दात स्वभाव सांगायचा झाल्यास :-
मेष- मीपणा,  वृषभ- व्यवहारी,  मिथुन- चंचलता,  कर्क- हळवा, सिंह- स्वाभिमानी, खमकी असतात. कन्या- चिकित्सक, संशयी स्वभाव.   तूळ- समतोलपणा,  वृश्चिक -गुप्तता,    धनू- आशावाद, मकर- महत्त्वाकांक्षा   कुंभ- मानवतावाद    मीन- कल्पकता.

मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

1. मेष राशीच्या व्यक्ती साहसी, ऊर्जावान आणि आत्मविश्वासू असतात. या राशीचा स्वामी मंगळ या व्यक्तींना स्पष्टवक्ता बनवतो. ताबडतोब निर्णय घेण्याच्या वैशिष्टय़ामुळे या व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या असल्याचे जाणवते. मेष राशीचा माणूस म्हणजे एक घाव दोन तुकडे.

2. प्रकृती काटक असते. ही माणसं अत्यंत चपळ असतात. अत्यंत कमी वेळात अधिक कामे करण्याकडे कल असतो. देहयष्टी मध्यम उंचीची. त्यांना केस विरळ असतात.
3. तुमच्याकडे खूपच स्पष्टवक्तेपणा, उतावळेपणा आहे. स्वभाव हट्टी असतो. स्वतः घेतलेल्या निर्णयात सहसा बदल करीत नाही. कांगावखोर सारखे करतात. खेळतांना प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनासारखी करून घेतात.मूड खराब झाला तर तसेच सहन करण्यापेक्षा या व्यक्ती स्पष्ट भांडून, बोलून विषय संपवतात. दुसऱ्यांची ईर्षां यामुळे त्यांची मानसिक शांती काही वेळा हरवते

. या व्यक्ती धार्मिक वृत्तीच्या असतात, पण अंधविश्वासू कधीच नसतात. स्वत:चे भाग्य स्वत: घडवण्यावर विश्वास ठेवतात. धैर्य, साहस, समजूतदारपणा या बळावर संकटांचा सामना करतात. 
.त्यांच्याकडे नेतृत्वगुण असतो. घर, कुटुंब आणि समाज यांना दिशा देण्याचे काम करतात.

.तुम्ही खूपच उत्साही आहात.जिद्द, महत्वाकांक्षा तुमच्याकडेआहे.प्रयत्नावरती तुमच्या विश्वास आहे. कोणत्याही प्रसंगामध्ये न डगमगता मार्ग काढता कठिणातल्या कठीण परिस्थितीमध्येही तुमची हिंमत टिकून राहते. खूपच धाडस, धैर्य, कार्यतत्परता, निर्णय तत्परता अधिक असते

.आई-वडील म्हणून या व्यक्ती आपल्या अपत्यांबद्दल अतिशय जागरूक असतात. त्यांना आपल्या मुलांबद्दलचे सगळे निर्णय स्वत:च घ्यायचे असतात. ते आपली मनमानी करतात
.विद्यार्थी वर्गाचा शास्त्र , गणित विषयांकडे अधिक ओढा असतो. त्यांची आकलनशक्ती तीव्र असते या राशीच्या व्यक्ती उच्च अधिकार पदावर जाऊन पोहचतात.
.आपल्या कुटुंबीयांशी फारशा मृदुभाषी नसल्याने कुटुंबीयांशी भांडणे होत राहतात. एकत्र कुटुंबात फारशी रमत नाही. वडील,भावंडे यांच्याशी फारसे पटत नाही. या व्यक्तीना घरकोंबडेपणा आवडत नाही.
१०.  स्वभावात उतावळेपणा, लहरीपणा असतो. तुम्ही अतीशय तापट आहात. चंचल वृत्ती असते. प्रवासाची आवड असते.  ही माणसं स्वातंत्र्यप्रिय असतात. या माणसांचा अहंभाव खूप झटकन दुखावला जातो.

११. लहान मुलांमध्ये चिडचिड्या स्वभावाचे प्रमाण अधिक असते
१२.. या राशीचा ऐहिक सुखोपभोगाकडे कल असतो. या राशीच्या व्यक्तींचा उत्कर्ष वय २८ पासून सुरु होतो.
१३. तुम्ही प्रेमाच्या बाबतीतही तितकेच अग्रेसर आहात. एकतर्फी प्रेम करणार्यांमध्ये मेष राशीचे प्रमाण अधिक आढळते. प्रेमात, प्रणयात या राशीच्या व्यक्ती आपले वर्चस्व गाजवतात

१४. वैवाहिक जीवनात मेष राशीची मंडळी सहसा तडजोड करीत नाही. आपला वैवाहिक साथीदार क्षणोक्षणी आपल्यासमोर आणि आपण म्हणू तसेच वागेल अशी अपेक्षा या मंडळींची असते. पती-पत्नी म्हणून या अतिशय रोमँटिक असतात. त्यांचा रोमँटिकपणा आत्मिक कमी आणि शारीरिक जास्त असतो. या स्वत:चे सगळे निर्णय स्वत: घेतात.

१५. मेष राशीच्या व्यक्तींनी मेष, मिथुन, सिंह, वृश्चिक, मकर कुंभ राशींच्या व्यक्तीशी लग्न करणे टाळावे. नाहीतर घरात बर्याचवेळा तलवारींचा खणखणाट ठिणग्या उडताना दिसतील. मेष राशींच्या आक्रमक व्यक्तींनी विशेषत: कर्क, तूळ, मीन . सौम्य आध्यात्मिक राशींचा जोडीदार निवडावा कारण या राशींचे पुरूष बरेचसे शांत असल्याने त्यांना मेष राशीची खमकी बायको मिळाल्यास त्यांच्या प्रपंचाची नौका भरकटत नाही कारण सुकाणू मेष जोडीदाराच्या हातात असते.

१६. तिखट ,चमचमीत पदार्थ खाण्याकडे अधिक कल असतो.
१७. सुरुवातीला त्यांचे आरोग्य चांगले असते पण जसे वय वाढते तशा आरोग्याच्या समस्या वाढतात. पोटाशी निगडित अनेक व्याधी त्यांना जडतात. हाडांचे विकार, सांधेदुखी यामुळेच या व्यक्ती त्रासतात. अनेकदा त्या अतिशय दमलेल्या दिसतात. त्यांच्या अ‍ॅग्रेसिव्ह वृत्तीमुळे जास्त दमतात. आयुष्यात दुर्घटनेचा सामना करायला लागतो. शस्त्राघात, जळणे, कापणे, वाहन, स्फोटके यांच्यापासून यांनी कायम सावधान राहिले पाहिजे. बालपणी पडल्यामुळे त्यांना मोठा त्रास होण्याची शक्यता असते.पित्ताविकाराचा त्रास संभवतो.उच्च रक्तदाबाचा त्रास उदभवतो. या माणसांना पाण्याची भीती वाटत असते. डोक्यावर , चेहऱ्यावर व्रण असतात. अंग चिडके असते. उष्णतेचे विकार होतात. काही लागल्यास जखम चिघळते

१८.अपघात झाल्यास डोक्याला मार लागण्याची शक्यता असते. मेंदूत रक्तस्राव होण्याची शक्यता असते.
१९. तरुणी, महिला यांना पाळीत उष्णतेचा त्रास अधिक होतो. गरोदरपणी सक्तीची विश्रांतीही ( बेड रेस्ट ) घावी लागते. गरोदरपणी दगदग न टाळल्यास , पुरेशी विश्रांती न घेतल्यास गर्भपात संभवतो.
20. भूमी आणि घर याच्याशी संबंधित क्षेत्रामध्ये त्यांना लाभ होऊ शकतो. बिल्डर किंवा बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरच्या रूपात त्यांना प्रतिष्ठा आणि धनप्राप्ती होऊ शकते. पोलिस, प्रशासन आणि राजकारणामध्ये त्यांना यश मिळू शकते. इंजिनीअरिंग आणि तांत्रिक क्षेत्रामध्ये त्यांचे करिअर चांगले आकाराला येऊ शकते. खेळामध्येही त्यांना यश मिळू शकते. नृत्य, नृत्य दिग्दर्शक म्हणून नाव मिळू शकते. शेती, मार्केटिंग, कंत्राटदार या कार्यामध्येही त्यांना यश मिळू शकते.

२१. यशप्राप्तीसाठी : मेष ही मंगळाची रास आहे. त्यामुळे मंगळवारी उपास करावा. काळ्या रंगाचा वापर करू नये. सूर्योपासना , गुरूची उपासना , श्री गणपतीची उपासना मेष राशीला भाग्यकारक ठरतात. वृश्चिक , कर्क , सिंह , धनु , अथवा मीन , राशीवर जन्मलेल्या माणसांच्या सहायाने त्याने धंदा चालविल्यास तो यशस्वी होतो.

२२. पोवळे हे मंगळ ग्रहाचे रत्न आहे मंगळवारी मंगळाचा होऱ्यात मंगळाचा जप करून तांबे अथवा सोन्यात अनामिकेत हे रत्न धारण करावे.

वृषभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

1. वृषभ राशीवर शुक्र ग्रहाचा अंमल असल्याने या राशीत पूर्णपणे शुक्राचे गुणधर्म पाहायल 

मिळतात. वृषभ राशीच्या व्यक्तींचा शरीरविषयक ऐहिक सूखोपभोगाकडे कल असतो. वृषभ राशीची 

 माणसे ही सौंदर्य शोधणारी, रसिक आणि नीटनेटकी असतात.

 

2.वृषभ राशीची माणसं देखण्या व्यक्तिमत्वाची असतात. गौरवर्णी असतात. चेहरा उत्साही असतो. डोळे मोहक असतात. वृषभ राशीचे पुरुष रुबाबदार , देखणे असतात. वाणीत ऋतुजा असते. तर वृषभ राशीच्या स्त्रिया मादक असतात , लक्षवेधी असतात.

 

3. वृषभ राशीची मंडळी खवय्ये असतात. चवीनं खाणारी असतात. खावो पियो मजा करो अशी वृत्ती असते. मित्रमंडळी जमवून मेजवान्या रंगवायला आवडतात. वडिलोपार्जित असणाऱ्या सर्व गोष्टीतून आनंद घेण्याकडे प्रयत्न असतो.

 

. पुरुषांना स्त्री आकर्षण विलक्षण असते. त्यांच्यात उपभोगी वृत्ती असते. पुरुषांना अत्तर , फुलं , सुवासिक तेल , पान अशा एकूण सर्वच प्रकारच्या छानछोकीची आवड असते.उंच कपडे , उंची वस्तू , आणि सुंदर स्त्री यासाठी यथेच्छ पैसा खर्च करायला आवडतो. विलासी वृत्ती असते. खेळाची आवड असते. ही माणसं चपळ असतात. पाळीव प्राण्यांकडे ओढ असते.

 

. या व्यक्तींमधील सौंदर्यदृष्टी अत्यंत वाखाणण्याजोगी असते. त्यांना रंगसंगतीची जाण असते. व्यवस्थितपणा , टापटीपपणा त्यांच्यात भिनलेला असतो. शिक्षणाकडे ओढ कमी असते. श्रीमंती थाटात राहायला आवडते. शेती , बागबगीचे , फळफळवळ याकडे कल अधिक असतो.

 

. तुम्ही खूपच व्यवहारी, हिशेबी, प्रॅक्टीकल आणि हट्टी आहात. परंतु तुमची इच्छा शक्ती तुमचा विश्वास, चिकाटी, एखाद्या कामामध्ये स्वतःला झोकून देण्याची वृत्तीमुळे तुम्ही प्रतीकूल परीस्थितीमध्येही चांगल्या रितीने टिकून राहतात.. विश्वासार्हता आणि चिकाटी हेच तुमचे मुख्य गुण आहेत जे तुमचे आयुष्य तारायला तुमच्या इच्छा आकांशा पूर्ण करायला शकतात.
 

७. आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी तुम्ही खूप कष्ट करतात. त्यामध्ये प्रेम, प्रामाणिकपणा असतो.या मंडळींना स्पर्धात्मक पातळीवर आव्हानं स्वीकारायला आवडतात.

 

८. व्यवहार कुशलते बरोबर काम करण्याची चिकाटी आहे. तुम्ही निर्मीतीक्षम, सर्जनशील आहात. तुमची सहनशीलता आणी आशावाद जबरदस्त आहे. वृत्ती निश्चयात्मक असून तुम्हाला सत्तेची भयंकर लालसा आहे. सगळया जगातल्या सुखसोयी तुम्हाला हव्या अस्तात.
. तुम्हाला सहसा कोणाशी शत्रुत्व करायला आवडत नाही. पण जर का तुमचे कोणाशी शत्रुत्व झालेच तर तुम्ही इथे मात्र थेट बैलाप्रमाणे थेट शिंगावरच घेता.

१०. वृषभ रास ही काहीशी बेधडक पण स्वभावाने अतिशय रसिक असते. जीवनातल्या अनेक गोष्टींचा आनंद घ्यायला यांना आवडते. नवीन ठिकाणे पाहणे, प्रवास, कला, शृंगार . यांच्या जिव्हाळ्याचे विषय असतात. यांना सर्वोत्कृष्ट जोडीदार असतो तो तूळ राशीचा. दोन्ही राशी शुक्राच्या आधिपत्याखाली असल्याने जीवनाचा मनमुराद आनंद लुटतात. यांनी मकर, सिंह या त्यांच्या तुलनेत काही प्रमाणात अरसिक असलेल्या राशींशी विवाह टाळावा.

 

११.बिल्डींग कंत्राटदार , प्रवासी गाड्या , शेती , बागायतदार , फुलांचे व्यापारी , सुगंधित द्रव्यांचे व्यापारी , कागदाचे व्यापारी , तैयार कपड्यांचे व्यापारी , सौदर्य प्रसाधने विक्रेते , ब्युटी पार्लर , मसाज केंद्र , नाट्य-चित्रपट-संगीत , व्यावसायिक , अभियंते , राजकारण , छायाचित्रकार , विडीओ-शुटींग , केबल युनिट व्यावसायिक आदींवर वृषभ राशींचा अंमल असतो.

१२. या राशींच्या व्यक्तींनी लक्ष्मी अथवा कोणत्याही देवीची आराधना करावी.


मिथुन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव
1.मिथुन राशीवर बुध ग्रहाचा अंमल असल्याने या राशीत पूर्णपणे बुधाचे गुणधर्म पाहायला मिळतात. ही माणसं सडपातळ देहयष्टीची काहीशी ठेंगणी अशा स्वरुपाची असतात. मिथुन राशीची माणसे बुधाप्रमाणेच वादविवाद व चर्चेत अत्यंत पटाईत असतात. यांचा मुख्य दोष म्हणजे यांचे धारदार बोलणे. हे अतिशय जिव्हारी लागेल असे बोलून जातात. जिंदादिल आणि पटापट उत्तरे देणारा माणूस मिथुन राशीचा असतो.

2.या व्यक्ती व्यवहारात अत्यंत हुशार असतात. व्यवहार चतुर असतात. हिशोबात प्रामाणिक पणा असतो. कुठल्याही गोष्टींचे नियोजन , आखणी प्रभावी असते. ही माणसं बुद्धीप्रधान असतात. त्यांची विचारशक्ती , आकलनशक्ती तीव्र असते.

3. मिथुन राशींची माणसं मोकळ्या मनाची असतात. ही माणसं गप्पिष्ट असतात. मिथुन राशीच्या मंडळींना हौसमौज करणे , मनसोक्त खरेदीसाठी फिरणे याची आवड असते. तसेच मनसोक्त झोप काढणे हाही त्यांचा एक आवडता छंद असतो.

4.मिथुन राशींच्या व्यक्तींचे वाणीवर , भाषेवर प्रभुत्व असते. या व्यक्तींमध्ये प्रभावी समर्थन शैली असते.  या मंडळींना लेखनाची आवड असते. वाचनाची आवड असते. बुद्धीबळ , कॅरमसारख्या बैठ्या खेळांकडे कल असतो. ही माणसं बोलकी असतात. समूह्प्रीय असतात. त्यांच्यात कौटुंबिक जिव्हाळा असतो.

5.या व्यक्ती रसिक असतात. त्यांची वृत्ती व्यासंगी असते. ही माणसं सतत हसतमुख असतात.. या व्यक्ती मिश्कील , विनोदी प्रवृत्तीच्या असतात. ही माणसं विनोद , किस्से रंगवून सांगतात.

6.त्यांना संभाषण कला अवगत असते सांस्कृतिक कार्यक्रमात सूत्रसंचालन चांगल्या पद्धतीने करतात. क्रीडा समालोचानाचेही त्यांच्यात कौशल्य असते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक समीक्षक , टीकाकार सुप्तपणे दडलेला असतो. या मंडळींची स्मरण शक्ती चांगली असते.

7. समयसूचकता, तर्कपध्दती, हास्यविनोद, लिखाण, हे चांगले गुण आणि अस्थिरता, गप्पागोष्टी, वेळ घालविणे, जाहिरातबाजी, चिडखोरपणा, पोरकटपणा हे तुमच्यामधील दूर्गूण आहेत.

8.तुम्हाला नवनवीन गोष्टींची आवड आहे. परंतु त्यातल्या नाविन्याची आवड ओढ संपल्यानंतर तुम्ही ते फेकून देतात.

9.समोरच्याला आपल्या बोलण्याने तुम्ही भांबावून सोडतात, तुमच्याकडे एवढा विनोदीपणा आहे की, तुम्ही समोरच्याला राग येईपर्यंत त्याची खिल्ली उडवितात. एखाद्या गोष्टीची जाहिरातबाजी तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यामुळे तुम्ही मार्केटींग लाइनला परफेक्ट बसू शकतात.

10.तुम्ही अतिशय कुशाग्र बुध्दीचे आहात. तुमची स्मरणशक्ती खूपच चांगली आहे. स्मरणशक्ती, हजरजबाबीपणा असल्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रसंगामधून तुम्ही तुमच्या बुध्दी-चातुर्याने त्यातून सहज बाहेर पडू शकतात.फक्त तुम्ही चटकन निर्णय घेऊ शकत नाहीत, किंवा तुमचे निर्णय तुम्ही एकदमच महत्वाच्या वेळी बदलतात. निर्णयाशी ठाम राहत नाही. यामुळे बऱ्याचवेळा तुमच्या जवळच्या लोकांना तुमचा त्रास सहन करावा लागतो.

11. मिथुन - ही अतिशय धारदार बोलणारी रास असल्याने यांच्या अरे ला कारे ने उत्तर देणारा जोडीदार असेल तर रोज भांडणे होतील. हे टाळण्यासाठी यांनी सौम्य स्वभावाचा म्हणजे कर्क, तूळ, मीन . राशींचा जोडीदार निवडावा.

१२.. कवी , ग्रंथकार , बालसाहित्यकार , वृत्तनिवेदक , सूत्रसंचालक , क्रीडासमालोचक, ग्रंथपाल क्यारमपटू , सचिव , समन्वयक , कुरियर संचालक , दुभाषी , वृत्तपत्र विक्रेता , पत्रकार , संपादक , मुलाखतकार , वकील , बुद्धीबळपटू , दळणवळण मंत्री , ज्योतिषी , पंडीत , विद्वान , शास्त्री , प्रकाशक , टेलिफोन ऑपरेटर ,व्यवस्थापक आदि मंडळी मिथुन राशीत अंतर्भूत होतात.

१३..मिथुन राशींच्या मंडळींना गुडघेदुखी , सांधेदुखी , स्तनाचे विकार , वायूचा त्रास संभवतो.

१४..मिथुन राशीच्या मंडळींना विशेषतः बुधवार शुभ असतो. वयाच्या ३२ व्या वर्षांनंतर मिथुन राशीच्या मंडळींचा उत्कर्ष होतो.

१५. या राशींच्या व्यक्तींनी गणपतीची आराधना करावी.

कर्क राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

1.कर्क ही रास जलतत्वाची रास आहे. चंद्र हा ह्या राशीचा स्वामी. चंद्र हा आल्हाददायक, शीतल असतो. परंतु त्याचा आकार रोज बदलताना दिसतो. चंद्र राशीस्वामी असलेली कर्क राशीची माणसे चंद्राप्रमाणेच शांत, देवभोळी व थोडीशी चंचल्/द्विधा मनस्थिती असलेली असतात. ही माणसे बुद्धीपेक्षा भावनेने निर्णय घेतात. सहज फसविता येईल अशी ही माणसे असतात. दुसऱ्याला जपणे आणि हळुवारपणा हे कर्क राशीचे लक्षण.

2.कर्क राशीची माणसं उंचीने मध्यम, सडपातळ असतात. या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. या मंडळींना पोहण्याची आवड असते.

3.ही माणसं कुटुंबवत्सल असतात. तुम्हाला कौटुंबिक जीवन जास्त आवडते. आपले घर आपला संसार या संबंधीत लहान मोठी स्वप्ने कशी पूर्ण करावीत यासाठी तुम्ही रात्र-दिवस धडपडत असतात. नातेवाईकांकडे रमणारी असतात.

4.सात्विक वृत्तीची ही माणसं असतात. ही माणसं सन्मार्गी असतात. त्यांच्या नाटकीपणा असतो. काहीशी निष्काळजी वृत्ती असते. ध्यानधारणा , पूजा-पाठ , उपासना , तीर्थयात्रा याची आवड अधिक असते.. या राशीचा कल सूखोपभोगाकडे अधिक असतो. शिक्षणाची आवड असते. चैनीकडे कल असतो

5.ही मंडळी अत्यंत लहरी असतात. घडीघडीला त्यांची मनस्थिती बदलत असते. क्षणात हसतील तर क्षणात रागावतील. क्षणात रुसतील तर क्षणात खुलतील.
तुम्ही खूपच हळवे असता. दुसऱ्याचे दुःख पाहुन तुम्हाला दुःख होते. तुमच्या डोळयामध्ये पाणी येते. एवढे तुम्ही हळवे कनवाळू मायाळू असतात.

6.तुम्ही खूपच भिडस्त स्वभावाचे आहात. तसे पाहीले तर तुम्ही खूप मुडी स्वभावाचे आहात. पण जरी तुमच्या मुड जाण्याच्या मागे मोठे ठोस कारण असले तरी सुध्दा तुम्हाला सर्वच भावना शब्दात मांडायला येत नाही. त्यामुळे तुमच्या स्वभावाला समोरच्याला जाणून घेता येत नाही. त्यामुळे थोडेसे मोकळेपणाने वागा.
7.चंद्र ज्याप्रमाणे कलेकलेने वाढतो कलेकलेने कमी होतो, अगदी त्याप्रमाणे तुम्ही कधी कधी सकारात्मक असतात तर कधी अचानकच देशाच्या कर्जाचा बोजा आपल्या एकटयावरच आहे की काय, असे नर्वस होतात. जशी अमवास्या पोर्णिमा अशी चंद्राची स्थिती असते, तशी तुमच्या मनाची अवस्था असते.

8.तुमच्या ओठावरती येणारा प्रत्येक शब्द हृदयाच्या ठोक्याप्रमाणे हळूवार पणे येतो, म्हणून तर तुम्ही हळवे असतात. जीवनातील प्रत्येक प्रसंग म्हणजे तो कोमल असो किंवा कठोर, तो अगदी हळूवारपणे अनुभवत असता.

9. कर्क - हे अतिशय भोळे, सरळमार्गी या प्रकारचे असतात. यांना मेष, धनू, सिंह, वृश्चिक अशा खमक्या राशीचा जोडीदार हवा. यांनी तूळ, मीन अशा सरळमार्गी आध्यात्मिक राशीच्या जोडीदाराशी लग्न करू नये. कारण दोघेही जोडीदार शांत भोळे असल्याने संकटात डगमगून जातात
१०. या मंडळींची कफ प्रकृती असते. सर्दी , पडसे , खोकला , दमा , इत्यादी पाण्यापासून होणारे आजार संभवतात.
११.मोती , मद्य , मीठ , मासे , मादक द्रव्य-पदार्थ विषयक त्यांचा व्यवसाय असतो
१२.. मोती हे चंद्र ग्रहाचे रत्न आहे सोमवारी चंद्राचा होरा असताना चंद्राचा जप करून चांदीत करंगळीत धारण करावी

 

सिंह राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

1. सिंह राशीचा राशीस्वामी रवि असल्याने या व्यक्तींमध्ये प्रबळ आत्मविश्वास असतो. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद यांच्यात असते.सिंह ही अग्नीतत्वाची रास आहे. अधिकार गाजविणारी , सत्ता गाजविणारी , सर्वांवर वर्चस्व गाजविणारी ही रास आहे. सिंह राशीची माणसे करारी, त्यांना तत्त्वांना मुरड घालणे पसंत नसते. रवि राशीस्वामी असलेली सिंह राशीची माणसे काहीशी रागीट, स्पष्टवक्ती, सत्याची चाड असलेली असतात.

 

2. सिंह ही पुरुष रास असल्याने या राशीच्या व्यक्ती मर्दुमकी गाजवत असतात. या राशीच्या व्यक्ती जिथे जातात तिथे त्यांचा प्रभाव आपोआपच पडतो. जसा जंगलात सिंहाचा दरारा असतो , त्याप्रमाणे सिंह राशीच्या व्यक्तींचा , त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडत असतो. तुम्ही रूबाबदार व्यक्तिमत्वाचे आणि राजा सारखे अधिकार गाजविणारे असता.  


3. ही माणसं अत्यंत प्रभावी असे नेतृत्व गुण देणारी असतात. ही माणसं परोपकारी असतात. जीवाला जीव देणारी असतात. ही माणसं अत्यंत पारदर्शक वृत्तीच्या असतात.


4.ही माणसं अत्यंत शूर , पराक्रमी , साहसी , निर्भीड असतात. या व्यक्तींना कुणीही अपमान केलेला सहन होत नाही. त्यांच्या विरोधात कुणीही बोलले तर ही माणसं खपवून घेत नाही.


5. या व्यक्ती सहसा कुणाच्याही पुढे पुढे करीत नाही. अत्यंत मानी स्वभाव असतो. लाचारी , न्यूनगंड हे शब्द त्यांच्या कोशातच नसतात.या व्यक्तींना कमी दर्जाचे काम करायला आवडत नाही. या माणसांमध्ये कुशल संघटन कौशल्य असते. त्यांच्यात निर्णयतत्परता असते. तसेच ही माणसं कार्यतत्परही असतात. ही माणसे चपळ असतात. त्यांच्यामध्ये प्रतिकूलतेवर मात करण्याची क्षमता असते.


6. तुम्ही राशी स्वभावाप्रमाणे रागीट असला तरी तुमचा राग म्हणजे ओढयाच्या पुरासारखा असतो, जितक्या झटकन येतो तितक्याच झटकन ओसरुन ही जातो. शत्रूवर समोरून , छातीवर गोळ्या झाडायला आवडतात. ही माणसं अत्यंत परखड बोलणारी असतात. जरी तुम्ही परीणामाचा विचार न करता समोरच्याला बोलून जात असले, तरी जबाबदारीची जाणीव ही तितकीच ठेवतात. त्यांच्यात सच्चेपणा , प्रामाणिकपणा असतो. ही माणसं काहीशी उतावळी असतात.


7. तुमच्यातील अहंकारी स्वभाव आणि स्पष्ट बोलण्याने तुमच्या सानिध्यातील माणसं तुमच्याकडून दुखावली जातात.  या राशींच्या व्यक्तींचा अहंपणा फार लवकर दुखावला जातो. ही माणसं सहजासहजी तडजोड स्विकारीत नाही. तसेच या मंडळींना कितीही विरोध झाला तरी तो विरोध मोडून स्वतःला हवी तशी गोष्ट सध्या करतात.या मंडळींना तिखट , चमचमीत पदार्थ खायला आवडतात.


8.प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर बरेचसे यश सिंह राशीची मंडळी मिळवितात.या व्यक्तींमधले अवसान हे अफाटच असते. वेळप्रसंगी कुणी मदतीला आले नाही तर ठरविलेली गोष्ट स्वतःच्या हिमतीवर करतात. जी गोष्ट करायला चार-चार माणसं लागतात तीच गोष्ट ही व्यक्ती प्रसंगी एकट्याच्या हिमतीवर करते.

9.स्वकर्तृत्वातूनच त्यांचे वेगळेपण दहाजणांमध्ये उठून दिसणारे असते. ह्या व्यक्तींना कुणावरही अन्याय झालेला सहन होत नाही. ही माणसं अत्यंत उदार अंतःकरणाची असतात. ही माणसं जितकी स्वाभिमानी असतात तेवढीच प्रेमळ असतात.


10.सिंह पुरुषांच्या बाबतीत सुंदर सुंदर स्त्रिया या मंडळींच्या छातीवर डोकं ठेऊन आपलं दुःख हलकं करतात. कठीण प्रसंगी , दुखद प्रसंगी दुसऱ्याला धीर देण्याची या माणसातील ताकद जबरदस्त असते. तुम्ही मनाने दिलदारही आहात, एखाद्याला सढळ हाताने मदत करण्याची वृत्ती ही असते. कुठलेही काम ही माणसं झोकून देऊन , उदार अंतःकरणाने करतात. मग त्यात स्वतःचे नुकसान किती होते , वेळ किती जातो याची कसलीही चिता ही मंडळी करीत नाही.


11. सिंह - हे सरळमार्गी, संतापी, सत्यप्रिय, स्पष्टवक्ते असतात. लबाड्या, छक्केपंजे, फसवणूक यांना जमत नाही. यांनी मेष, वृश्चिक, मकर कुंभ राशींशी विवाह टाळावा.

१२. तुम्ही मानला तर देव नाही तर दगड, असे टोकाचे अस्तिक किंवा नास्तीक असता. म्हणजे कस एक तरी दोन्ही वेळची आरती न चुकवणारे नायतर कळस बघितला तरी नजर फिरविणारे. 

१३..तुम्ही राग अहंकार, फटकळ पणा सोडून द्यावा. माणसाने पथ्य पाळले तर आरोग्य आयुष्य आबादित आणि राशीतले तथ्य कळले कि भविष्य आबादित.


१४. जागतिक पातळीवर नेत्रदीपक यश मिळविणाऱ्या व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये सिंह रास आघाडीवर असल्याचे प्रत्ययास येते. हुकुमाने इतरांकडून काम करुन घेण्याची तुम्हाला सवय आहे. कर्क राशीसारखे भावनेवरती भर न देता कर्तव्यासाठी कठोर वागतात.


१५. विवाहितांच्या बाबतीत आपला वैवाहिक साथीदार तसेच आपली प्रिय व्यक्ती क्षणोक्षणी सतत डोळ्यासमोर हवी अशी त्यांची अपेक्षा असते.


१६. पाठदुखी , हृदयविकार , रक्तदाब , पित्तविकार इत्यादी त्रास या राशीच्या मंडळींना संभवतात. या राशींच्या व्यक्तींना पाण्यापासून भय असते.


१६. माणिक हे रवि ग्रहाचे रत्न आहे रविवारी रविच्या होरा असताना रविचा जप करून सोन्यात अनामिकेत धारण करावी

 

कन्या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव.
1.कन्या राशीचा स्वामी बुध असल्याने या राशीत बुधाचे गुणधर्म पाहायला ह्या राशीची माणसं अत्यंत बोलकी असतात. त्यांचा भाग्योदय 32 व्या वर्षी होतो. सावध आणि चिकित्सक अशी कन्या राशीची माणसे स्वतः टेन्शन घेतात आणि दुसऱ्यालाही देतात. कन्या राशीची माणसे बोलण्यात शार्प असतात, पण मनातून भित्री असतात.

2.
तुमचा इतरांपेक्षा वेगळा स्वभाव म्हणजे तुम्ही अत्यंत चिकित्सक आहात. काही पण होऊ दे, पण बुध्दी पणाला लावून प्रत्येक गोष्टीचा तुम्ही बारकाईने किस काढतात. अशामुळे काय होतय बुध्दीमान असूनही बुध्दीचा योग्य वेळी योग्य वापर केला जात नाही. बुध्दीचा वापर चुकीच्या पध्दतीने झल्यामुळे तुमच्या वरती पश्चाताप करण्याची वेळ येते. 

3.या राशीचा अंमल मुख्यत्वे करून पोटावर असतो. ही माणसं कालानिपून असतात. त्यांची अभिरुची उच्च असते. भाषेवर प्रभुत्व असते. ही माणसं परंपरावादी असतात. प्रेमळ असतात.

4. ही माणसं घरात रमणारी असतात.कुटुंबवत्सल असतात. एकत्र कुटुंब पद्धतीकडे त्यांचा अधिक कल असतो. ही मंडळी कधीच एकटी राहू शकत नाही.

5..ही माणसं सदाचारी , सन्मार्गी असतात. दुसऱ्याला समजून घेतात. भाऊक , लाघवी असतात. दुसरयाविषयी आत्मीयता , जिव्हाळा असतो. आपुलकी असते.

6.ही माणसं चांगले लेखन करू शकतात. त्यांची आकलन शक्ती चांगली असते. व्यवहार कुशलता त्यांच्यात असते. दुसऱ्याला सहकार्य करण्याची त्यांच्यात असते. चवीनं खाणारी असतात. त्यांची राहणी अत्यंत साधी असते. हसत बोलण्याची लकब असते. ही माणसं संवेदनशील असतात. काव्याची भोक्ती असतात.

7. कन्या राशीचा स्वामी बुध असल्याने ही मंडळी दुसऱ्यांशी चांगल्या पद्धतीने सुसंवाद साधू शकत असल्याने त्यांचा लोकसंग्रह मोठा असतो. त्यांच्यात समर्थन शैली प्रभावी असल्याने जनसंपर्क मोठ्या प्रमाणात असतो.

8. कन्या - ही गरीब स्वभावाची रास आहे. कायम संशयी स्वभाव हे यांचे वैशिष्ट्य. यांनी कर्क, मीन, तूळ . राशींचा जोडीदार निवडू नये.


९.बुधाचा शत्रू मंगळ त्यामुळे मंगळाच्या राशी मेष आणि वृश्चिक या राशींशी कन्या राशीचे जमत नाही. कन्या राशीच्या व्यक्तींना बुधाची महादशा , अंतर्दशा विशेष फलदायी ठरते. शुक्राच्या अंतर्दशेत अथवा महादशेत कला , पैसा , विवाह , प्रतिष्ठा या दृष्टीने अत्यंत शुभफळ मिळतात. मंगळाच्या अंतर्दशेत अथवा महादशेत प्रकृतीच्या दृष्टीने प्रतिकूल फळं मिळतात. आर्थिक समस्या उभ्या राहतात.

१०. ज्योतिष , बुद्धीबळ , साहित्य , पत्रकारिता , कायदा आणि गणित या विषयांकडे त्याचा ओढा अधिक असतो.पत्रकार , सेक्रेटरी , पुस्तक विक्रेते , किरकोळ व्यापारी , आदी मंडळी कन्या राशीमध्ये आढळतात.

११. पाचू हे बुध ग्रहाचे रत्न आहे. बुधवारी बुधाचा होरा असताना बुधाचा जप करून सोन्यात अथवा चांदीत करंगळीत ही अंगठी धारण करावी.


तूळ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव.

1. तूळ  ही शुक्राची रास असल्याने तूळ राशीच्या व्यक्तिमत्वावर पूर्णपणे शुक्राच्या कारकतत्वाचा प्रभाव आढळतो.
या व्यक्ती आकर्षक असतात. स्वत:ला व्यवस्थित प्रेझेंट करणं यांना उत्तम जमतं.  या व्यक्तींचे शरीर वयाच्या मानाने अधिक तरुण दिसते. त्यांची कांती सतेज असते.  सर्व राशींमध्ये तूळ राशीची मंडळी सर्वाधिक देखणी असतात. चेहऱ्यामध्ये मोहकता असते.

2.तूळ राशीची माणसे समतोल विचारांची आणि संतुलन बिघडू न देणारी असतात,या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्त्व संतुलित असते. या व्यक्ती राग, संताप, उत्तेजना यांपासून मुक्त असतात. आपले दु: दाखवत नाहीत. त्यांचे विचार स्पष्ट असतात. काळाबरोबर त्यांचे विचार बदलत जातात. कलात्मक दृष्टिकोन असतो.

3.जनसंपर्क दांडगा असतो. कूटनीतीमध्ये तज्ज्ञ असतात. पाहुण्यांचे आदरसत्कार करायला त्यांना अत्यंत आवडते. लोकांना आपलेसे करून घेण्यात चतुर असतात.

4.तर्कशास्त्र उत्तम असते. यांचे चिन्ह तराजू न्यायाचे प्रतीक आहे. या व्यक्ती रजोगुणी असतात. आपले काम साधून घेण्यात माहीर असतात. सहनशील, आध्यात्मिक विचारसरणीचे, शांतताप्रिय पराक्रमी असतात. कमी पैशातही ते आरामदायी जीवन जगतात. यांची वाणी यांचे मुख्य आकर्षण आहे. एकापेक्षा अधिक जोडीदारांशी संबंध ठेवण्याकडे यांचा कल असतो.

५..तूळ राशीचे माणसं अत्यंत कामुक असतात. या व्यक्ती भिन्न लिंगी व्यक्तींना फार झटक्यात 

मोहित करून घेतात. भिन्न लिंगी व्यक्तींकडे ही माणसं खूप झटकन आकर्षित होतात. या 

मंडळींमध्ये उपजत सौंदर्य दृष्टी असते. रसिकता असते. ही माणसं कलाप्रेमी असतात. व्यासंगीवृत्ती

असते. संघर्षापासून दूर राहायला आवडते.

६.ही माणसं अत्यंत संयमित वृत्तीची असतात.कुठल्याही परिस्थितीत ही मंडळी आपल्यातला 

समतोल ढळू देत नाहीत. या राशींच्या व्यक्ती अतिशय रसिक व जीवनाचा आस्वाद घेणार्‍या 

असतात. अनेक कलाकारांची तूळ रास आढळते.

७. ही माणसं सतत हसतमुख असतात. चेहऱ्यावर प्रसन्नता असते. त्यांची अभिरुची उच्च असते. ही

 माणसं आपल्या भावंडांवर अपर प्रेम करतात. प्रेमात आतुरता असते.

८. तूळ ही शुक्राची रास आहे. धनु आणि मीन राशी ह्या गुरूच्या राशी असल्याने त्यांच्याशी तूळ 

राशीचे पटत नाही. मंगळाशी निसर्गतः आकर्षण असल्याने मेष-वृश्चिक राशीशी तूळ राशीचे झटकन

 जमते.

९. तूळ राशींची माणसं अधिक न्यायप्रिय पाहायला मिळतात. संपत्ती ,ऐश्वर्य या राशींकडे 
चालून येते. ह्या व्यक्ती विलासी वृत्तीच्या असतात.

१०.तूळ राशीतील सात्विकतेची परीक्षा गुरु पाहतो.त्यामुळे तूळ राशीचे धनु आणि मीन 


राशीशी जमत नाही.

११.कोणत्‍याही परिस्थितीत ते विचलीत होत नाहीत. दुस-यांना प्रोत्‍साहन देणे, मदत करणे 
त्‍यांच्‍या स्‍वभावात असते.  या व्‍यक्‍ती कलाकार, सौंदर्योपासक व प्रेमळ स्‍वभावाच्‍या 

असतात. मित्रांमध्‍ये ते लोकप्रिय असतात.  काहीवेळेस ते व्‍यसनाधीन बनण्‍याची शक्‍यता 

देखील असते.
 
१२.तूळ स्त्रिया मोहक व आकर्षक असतात. या स्त्रिया आनंदी आणि हसतमुख स्वभावाच्य 


असतात.  बौद्धिक कामात त्‍यांना अधिक रस असतो. कला, गायन आणि घरकामात दक्ष 

असतात. छोटी मुले त्यांना खूप प्रिय असतात. 



१३.तूळ राशीचे मुले संस्कारी आणि आज्ञाधारक असतात.  खेळात आणि कलेच्याक्षेत्राची

त्यंना आवड असते. ही मुले घरात राहण्‍यास जास्‍त प्राधान्‍य देतात. 



१४.तूळ राशीच्या व्यक्तींची मुले शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी बाहेरगावी जाण्‍याची

 शक्‍यता असते. या व्यक्ती खर्चिक प्रवृत्तीच्या, बुद्धिमान, विवेकी स्वभावाच्या आणि 

कलात्मकतेची आवड असणार्‍या असतात.


१५.चित्र, शिल्पादी ललितकलेकडे ओढा असणार्‍या या व्यक्तींना कलावंत होण्याकडे रस दिसून येतो. विद्वान, शास्त्रज्ञ, सधन, न्यायधीश, सरकारी नोकरीत काम करणारे, वकील, चित्रकार, शिल्पकार, गायक अशा व्यक्ती तुला राशीत आढळून येतात. आपल्या मनाचा थांगपत्ता लागू न देणार्‍या या व्यक्ती हेर खात्यातही कार्यरत असतात वकील, कायदेशीर सल्लागार, पत्रकार, लेखक, दिग्दर्शक, हिरा-जवाहिर, परफ्युम्सचे व्यापारी. रेस्टॉरंट बारशी संबंधित कामे, खाद्य पदार्थ, चणे, तांदूळ रेशीम यांच्याशी संबंधित कार्य, तर्कशास्त्र, कलाकार, साहित्य, नृत्यकला, इंटिरिअर डिझायनर.

१६.हिरा हे शूक्र ग्रहाचे रत्न आहे शुक्रवारी शुक्राचा होरा असताना शुक्राचा जप करून सोन्यात अनामीकेत धारण करावी।

वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा स्वभाव


1. वृश्चिक राशीचा राशीस्वामी मंगळ असल्याने वृश्चिक राशीची माणसं अत्यंत शूर, साहसी, पराक्रमी , महत्वाकांक्षी , चपळ , आक्रमक, तामसी , जिद्दी असतात. आक्रमक व डूख धरून सूड उगविणारी रास. हे अतिशय दीर्घोद्योगीही असतात

२.ही माणसं आतल्या गाठीची असतात. स्वतःच्या मनातलं झटकन सांगत नाहीत. दुसऱ्याकडून मात्र ही मंडळी कुठलीही गोष्ट कौशल्याने काढून घेतात. दुसऱ्यांच्या व्यक्तिगत व गोपनीय गोष्टी ऐकायची यांना खूप उत्सुकता असते


३. कठोर बोलण्यामुळे ते कळत नकळत अनेकांना दुखावून जातात. ही माणसं परखड बोलतात. मात्र स्वतःच्या बोलण्याने विनाकारण दुसऱ्याचा रोष ओढवून घेतात. वेळ साधून अचूक बोलतात. मात्र त्या बोलण्याने समोरचा घायाळ झाल्याशिवाय राहत नाही. सापासारखी डुख धरून राहणारी असतात.


४. वृश्चिक राशीची माणसं एकत्र कुटुंबात रमणारी असतात. ही माणसं एकांतातही रमतात. ही माणसं प्रसंगी मतभेद बाजूला ठेवून दुसऱ्याला मदत करणारी असतात. ज्या व्यक्तीला जीव लावतात तिच्यासाठी जान देण्याचीही त्यांची तयारी असते. दुसऱ्यांना आपलेसे करून घेण्याच्या कलेत मात्र ते निष्णात असतात. ते अत्यंत मूडी असतात. अहंकारी असतात.गर्विष्ठपणा त्यांच्यात असतो.

५.त्यांना संशोधन कार्याची आवड असते. त्यांची इच्छा शक्ती प्रबळ असते. ही माणसं महत्वाकांक्षी आणि व्यवहार चतुर असतात. दुसऱ्यावर वर्चस्व गाजविण्याची त्यांची वृत्ती असते. भानगडीच्या गोष्टीत , उद्योगात त्यांना अधिक रस असतो.


६. यांना वयाच्या २८व्या वर्षांपर्यंत थोडा त्रास सहन करावा लागतो. पण त्यानंतर मेहनत व कष्टाळू वृत्तीमुळे भविष्यात ते अद्भुत प्रगती करतात.


७. यांचे आरोग्य सामान्य असते. वाढत्या वयासोबत वाढत्या वजनाचा त्रास होतो. रक्तदाबाचा, डिप्रेशनचा, पित्ताविकाराचा त्रास संभवतो.



८. ही माणसं अत्यंत कामुक असतात. या व्यक्तींना लैंगिक संबंधांबद्दल एक विशेष ओढा असतो. यांच्या वैवाहिक जीवनात अनेकदा तणाव दिसून येतात पण समजूतदारपणे या व्यक्ती त्यावर नियंत्रण ठेवतात. यांनी मेष, सिंह, मकर व मेष या आक्रमक राशींच्या व्यक्तींशी विवाह टाळावा.

९. त्यांना आयुष्यात अनेक चणचणींना तोंड द्यावे लागत असले तरीही कोणी यांना सहजपणे खरेदी करू शकत नाही. ते कोणाला सहजी फसवत नाहीत. त्यांना कराव्या लागणाऱ्या संघर्षांमुळे त्यांचे गुण सोन्याप्रमाणे तावून सुलाखून निघतात.

१०. सामाजिक आयुष्यात सन्मान प्राप्त करणाऱ्या या व्यक्तींचे नातेवाईकांबरोबर मात्र ताणतणावाचे संबंध असतात. या राशींच्या व्यक्तींना गणपती तसेच इष्ट देवतेची उपासना केल्यास फलदायी ठरते.


११.शुभ करिअर : इंटीरिअर डिझायनर, इंजिनीअर, मेडिकल, अभिनय, रिसर्च व डेव्हलपमेंट, कन्स्ट्रक्शन, डिटेक्टिव्ह एजन्सी, औषधक्षेत्र, सुगंधी पदार्थ, राजकारण.
सुपारी, लोखंड, उस, गूळ याच्याशी संबंधित व्यापारउद्योग. 


 धनु राशीच्या व्यक्तींचा स्वभाव


1.धनु राशीचा राशीस्वामी गुरू असल्याने धनु राशींच्या मंडळींचे व्यक्तिमत्व प्रभावी असते. त्यांच्या शब्दाला वजन असते. धनु ही गुरूची रास आहे. त्यामुळे त्यांच्यातील सद्सदविवेक बुद्धी सतत जागरूक असते.

२. या मंडळींची देहयष्टी नजरेत भरण्यासारखी असते. शरीरयष्टी बांधेसूद असते. ही माणसं धिप्पाड असतात. दंड पिळदार असतात.  माणसं शूर,पराक्रमी असतात. ही माणसं लढाऊ वृत्तीची असतात. 

३.धनु राशीची माणसं सत्वगुणी, धार्मिक, सन्मार्गाने जाणारी असतात. त्यांच्यात सदाचार असतो. उच्च आदर्शवाद असतो. ही माणसं अत्यंत न्यायप्रिय असतात. त्यांच्यात सचोटी असते. प्रामाणिकपणा असतो. ही माणसं बुद्धिमान असतात. मनाने अत्यंत उदार असतात.

४. ही माणसं सात्विक समाधानी वृत्तीची असतात. ही माणसं मातृभक्त असतात. गृहसौख्य वाहन सुखही मनाजोगे लाभते. या राशीच्या मंडळींनी गुरु दत्तात्रयाची आराधना करावी.

५.धनू राशीची माणसे सत्यप्रिय असतात, पण मीन राशीइतकी देवभोळी नसतात. त्यांच्यात काहीशी आक्रमकता असते. सत्वगुणी पण काहीशी आक्रमक व समतोल माणसे या राशीत आढळतात

६.नेहमी सत्य मार्गाने चालणे न्यायप्रियता या सद्गुणामुळे तुमचे कोणाबरोबरही सहसा शत्रुत्व होत नाही. समजा चुकून वादाचा प्रसंग उद्भवलाच तर त्यात वेळ न काढता तुम्ही चाणाक्षपणे तुमचा मार्गच बदलतात. सर सलामत तो पगडी पचास! वाद घालून एक शत्रू निर्माण करण्यापेक्षा दहा नविन मित्र जोडावेत या तत्वाने तुम्ही जीवनामध्ये पुढे जातात.

७.या मंडळींना पित्त, रक्तदाब, दमा, सर्दी, पडसे, खोकला इत्यादी विकार उदभवतात. मांड्या दुखतात.

८. यांनी कोणत्याही राशीही लग्न केले तरी चालेल, पण मेष, वृश्चिक, मकर व कुंभ राशींशी यांचे खटके उडतील.

९. पूष्कराज हे गुरू ग्रहाचे रत्न आहे. गुरूवारी गुरूचा होरा असताना गुरूचा जप करून सोन्यात तर्जनीत धारण करावी.

मकर राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

1.मकर रास ही शनिची रास आहे. त्यामुळे या राशीत मुळात अत्यंत कष्टाळू मनोवृत्ती ,शारीरिक सोशिकता अधिक असते. कुठल्याही प्रकारचे काम अत्यंत चिकाटीने , सातत्याने करण्याचे कौशल्य असते.

2. मकर रास असलेल्या माणसाच्या जीवनात प्रत्येक गोष्ट विलंबानेच होते. दीर्घोद्योगी व कष्टाळू लोकांची रास. यांच्यात भावनेला फारसे महत्त्व नसते. काहीशी अरसिक, कर्तव्यकठोर माणसे या राशीत आढळतात.

३.मकर रास ही शनिची रास असल्याने या राशीची मंडळी कुठलाही निर्णय झटपट घेत नाहीत. निर्णय घेण्यास विलंब लावतात. त्यांना कुठल्याही बाबतीत घाईगर्दी केलेली आवडत नाही.

४.मकर राशीच्या मंडळींच्या यशासाठी सतत झटावे लागते. प्रयत्नांच्या मानाने नेहमीच यश कमी आणि अपेक्षित वेळ टळून गेल्यावर मिळते.  या राशींच्या मंडळींचा उत्कर्ष वयाच्या तिसाव्या वर्षानंतर होतो. तौलनिक दृष्ट्या ह्या राशीच्या मंडळींच्या आयुष्यातील उत्तरार्ध अधिक उत्कर्षदायी ठरणार असतो.

५. इतर राशींच्या तुलनेनुसार तुमच्या जीवनामध्ये अधिक अडचणी येतात, पण कर्म हाच देव कठोर परीश्रम हिच पूजा असे मानून तुम्ही कर्तव्याला प्राधान्य देता. तरीही तुम्हाला नशीब हुलकावणीच देत खरंच नशीब लपाछपीचा खेळ खेळत राहतो.
६. तुम्ही व्यवहाराचे खुप पक्के आहात, त्यामुळे द्या आणि घ्या या तत्वाने वागता कुणाला उधार देणार नाही आणि कुणाचे उधार घेणार नाही. तुम्ही धर्मिक प्रवृत्तीचे असूनही दान हा शब्द तुमच्या शब्दकोषात शक्यतो नसतो. या व्यक्ती काटकसरी असतात.

७.या व्यक्तींमध्ये सौंदर्य दृष्टीचा अभाव आढळतो. त्यांच्यात सामान्य बुद्धीमत्ता असते. मात्र कष्टात कुणी त्यांचा हात धरू शकणार नाही. ही माणसे भोगवादी असतात. त्यांचे अंतःकरण अत्यंत प्रेमळ असते.

८. तुम्ही खुपच जिद्दी स्वभावाचे असून एखादी गोष्ट मिळवताना कितीही अपयश आले तरी ती गोष्ट अर्धवट सोडणार नाही, चिकाटी सोडणार नाही, यश मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. तुम्ही मनाने खूप चांगले आहात, पण समोरची व्यक्ती तुमच्याशी चांगली वागत असेल तर म्हणजे तुमचा चांगुलपणा ही समोरच्यातील चांगुलपणावर अवलंबुन असतो.

९.प्रत्यक्षात पाहीले तर तुम्ही न्यायप्रिय संयमी शांत स्वभावाचे असता. मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावरती प्रगती साधता. मान सांगावा जगाला आणि अपमान सांगावा मनाला, या म्हणी प्रमाणे तुम्ही मनातल कधीच कोणाला सांगत नाही

१०.दीर्घोद्योगी कष्टाळू लोकांची रास. यांच्यात भावनेला फारसे महत्त्व नसते. काहीशी अरसिक, कर्तव्यकठोर माणसे या राशीत आढळतात. यांनी मेष, वृश्चिक, सिंह कुंभ राशीशी विवाह टाळावा.

११.लोखंडाचा व्यापार , कारखाने , खाणीतील कामगार , हलक्या दर्जाची कामे करणारी मंडळी , काळ्या वस्तूंचे व्यापारी , झाडूवाले , तेलाचे व्यापारी , वकील , न्यायाधीश , कोर्ट-कचेरीतील कर्मचारी , अंत्यविधीचे सामान विक्रेते , वाळू-दगड-माती पुरविणारे दलाल इत्यादी गोष्टी मकर राशीच्या अंमलाखाली येतात.

१२.मकर राशीच्या लोकांनी हनुमान चालीसा पठण करावे.

 


कुंभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव


1.कुंभ रास ही शनीची रास आहे. कुंभ राशीची माणसं काहीशी सडपातळ आणि उंचपुरी असतात. सखोल ज्ञानाने विरक्त झालेली माणसे कुंभ राशीची असतात.

२.बुद्धिमान लोकांची रास. हे भावनाप्रधान असतात पण नेहमी निर्णय बुद्धीनेच घेतात. या राशीची माणसे अतिशय अहंकारी व तुसडी असतात. स्वतःला जरा जास्त शहाणे समजणार्‍या माणसांची ही रास आणि हा अहंकार बुद्धिमत्तेतून आलेला असतो.

 

३.ह्या व्यक्तींना भिन्नलिंगी व्यक्तींविषयी अधिक आकर्षण असते. ही माणसं अत्यंत बुद्धिमान असतात. तुमच्याकडे बुद्धी-विद्वत्ता असल्यामुळे तुमचे बौध्दिक चर्चेमध्ये, बौध्दिक कामामध्ये मन रमते. त्यांना संशोधन कार्याची आवड असते. ही मंडळी बौद्धिक क्षेत्रात स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विशेष ठसा उमटवतात. ही माणसं दुसर्यांवर खूप झटकन विश्वास टाकतात. ही माणसं धीराची असतात. कठोर अंतःकरणाची असतात.


४. तुमचा आरामदायी जीवनाकडे कल असतो. त्यामुळे बऱ्यापैकी तुम्ही कष्टापासून जरा दूरच राहता.

५.कुंभ राशीच्या मंडळींना सुगंधी पदार्थांविषयी विशेष आकर्षण असते. या राशींच्या मंडळींना शरीरातील वातामुळे आजार उदभवतात. पोटाचे विकार संभवतात. कुंभ ही शनिची रास असल्याने आयुष्याचा उत्तरार्ध दीर्घकालीन आजारात जातो.



६. यांनी कोणाशीही लग्न केले तरी कायम स्वत:चाच वरचष्मा गाजवायचा प्रयत्न करतात. यांनी सुद्धा यांनी मेष, वृश्चिक, सिंह व कुंभ राशीशी विवाह टाळावा. नाहीतर घरात रोज भांडणे होतील.

मीन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

१.मीन राशीचा स्वामी गुरु असल्याने ह्या राशीच्या व्यक्ती सदाचारी , सन्मार्गी असतात. ही माणसं स्वभावाने अत्यंत प्रेमळ ,लाघवी असतात. दुसऱ्याला जीव लावतात. त्यांच्यात परोपकारी वृत्ती असते. ही माणसं समाज प्रबोधन घडवितात. ही माणसं बुद्धिमान असतात.
२.नकळत विनोद घडणारी, समजुतीचा घोटाळा करणारी आणि बोलण्यात तोचतोचपणा असलेली माणसे मीन राशीची हे ओळखावे.

३. गुरूची आध्यात्मिकता मीन राशीत प्रकर्षाने दिसते. मीन राशीची माणसे अतिशय देवभोळी व आध्यात्मिक असतात. मनापासून देवपूजा करणे, जपजाप्य, पोथ्या वाचणे इ. गोष्टी या व्यक्ती मनापासून करतात. या व्यक्ती सरळमार्गी पण घाबरट असतात.

४.त्यांच्यात सद्सदविवेक सतत जागरूक असतो. ही माणसं दुसर्याच्या हिताकरिता झटत असतात. त्यांच्या जवळ दुसऱ्याविषयी आत्मीयता , प्रेम , जिव्हाळा , करुणा , सहिष्णुता असते. ही माणसं आदर्शवादी असतात. ध्येयवादी असतात. त्यांच्यात सचोटी , प्रामाणिकपणा असतो.

५.त्यांचा मनावर ताबा असतो. ही माणसं समाधानी वृत्तीची असतात. त्यांच्यात विनय , नम्रता , सोशिकता असते. वाणीत ऋजुता असते. त्यांची देहयष्टी ठेंगणी , स्थूल असते. त्यांच्यात सालस देखणेपणा असतो. मीन राशीचे लोक उदार, संवेदनशील, कल्पनाशील, करुणामय आणि विनम्र असतात. स्वतकडून काही चुका झाल्यास हे लोक लगेच मान्य करतात. मनाने मोठे व परोपकारी असतात.

६.त्यांच्यात एकाग्रता असते. ध्यानधारणा , उपासना याची आवड असते. ही माणसं वरच्या पदावरची जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळतात. या व्यक्तींना प्राणीमात्रांविषयी भूतदया असते. ही माणसं सात्विक, संगीतप्रेमी, शांतताप्रेमी असतात.

७.मीन राशिचे लोक शांत व कौटुंबिक जीवनाला आपल्या जीवनात बरेच महत्त्वाचे स्थान देतात. आपल्या घराचे वातावरण देखील शांततापूर्ण असते. आपले ‍बरेच मित्र असतात या राशिचे लोक घरच्या प्रकरणात लवकर भावनिक होतात. यांचा आपल्या वडिलांवर खुप विश्वास असतो. आईशी यांचे जास्त पटत नाही.

८. आपल्या भविष्याबाबत आपण फारच चिंतित आहात व वृद्धावस्थेत कुणावरही ओझे बनणे आपल्याला आवडत नाही.याच विचाराने आपण भविष्यासाठी निधी जमा करण्यावर विश्वास ठेवता.आपण आवश्यकता असलेल्यानां मदत करण्यास नेहमीच पुढे असता परंतु उधार पैसे देताना मात्र सावध राहता.

९. स्वार्थी-मतलबी मंडळी मीन राशीच्या व्यक्तींच्या प्रेमळ स्वभावाचा गैरफायदा घेतात. दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती मीन राशीत असल्याने ढोंगी माणसं त्यांचा गैरफायदा घेतात. मीन राशीला भ्रातृसौख्य मनाजोगे मिळत नाही. भावंडांसाठी अनाठायी पैसा खर्च करावा लागतो.

१०. वैवाहिक जीवनात तसेच कौटुंबिक जीवनातही प्रेम , सामंजस्य राहते. विवाहसौख्याबरोबर मातृसौख्यही मनाजोगे लाभते. शिक्षण , संतती , कला या दृष्टीने मीन राशीला शुभ फळे मिळतात. मीन राशीच्या चेहऱ्यावर सतत एक सात्विक भाव आणि समाधानी वृत्ती , शांतपणा जाणवतो.

११.चंचलता द्विधा मनःस्थिती तुमच्यामध्ये दिसून येते. विसराळुपणा आणी भोळसटवृत्ती अंगी असल्यामुळे तुम्ही गोंधळलेले दिसतात. विचारातील निर्णयातील ठामपणा तुमच्यापासून काहीसा दूरच असतो.सतत मानसिक दडपणाखाली राहिल्यामुळे तुमचे निर्णय वारंवार बदलत राहतात. एकावेळी एकाच कामावर लक्ष केंद्रीत करणे निर्णय क्षमता ठेवणे आळशीपणा सोडून देणे या सद्गुणांचा स्वीकार केला तरच तुम्ही यशचे मानकरी ठराल.

१२. प्रकृतीबद्दल यांना सदैव चिंता व काळजी वाटत असते. म्हणून ते प्रकृतीची काळजी घेण्यात सदैव अग्रेसर असतात. सुरुवातीपासून यांचे आरोग्य सामान्य असते. पण काही काळानंतर मात्र यांना डोळ्यांचे विकार होण्याचा संभव असतो. वय वाढताना यांनी तब्येतीची योग्य ती काळजी घ्यावी. नाहीतर यांना उच्च रक्तदाब यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागेल. यांना हाडांच्या त्रासाचा संभव असू शकतो. कफ आणि वात यांचं दुखणंही डोकावू शकतं. या राशिच्या लोकांना रक्त दाब, ह्रदय विकार , पायांचे विकार ,छातीत दुखणे ,चक्कर येणे, डोके दुखी होण्याची भिती असते, पायांना सारखा घाम येणे, कफ ,टायफाईड हिस्टीरिया, चर्म रोग ,सर्दी ,कर्ण रोग यांच्या पैकी एक होण्याची शक्यता आहे.

१३. जीवनात एकदा तरी ऑपरेशनची वेळ येते. मादक पदार्थांचे सेवन करण्यावरून शरीराला जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. यांचे पचनसंस्थेत सतत काही ना काही बिघाड असतो. या राशिच्या लोकांना घाम जास्त येत असतो.

१४. मीन राशिच्या लोकांना मुख्यत संगीत, कला व साहित्याच्या क्षेत्रात यश मिळते. आपल्या शिक्षणात त्यांनी या विषयांची विशेष प्रकारे काळजी घेतली पाहिजे. तसेच त्यांना फोटोग्राफी, ज्योतिष, कला व सुंदरतेशी संबंधित विषयांचे अध्ययन केल्यास आपल्याला यश मिळते. शिक्षक , प्राध्यापक , धर्मप्रसारक , सुपरवायझर , अधिकारी. खलाशी , मच्छेमारी व्यावसायिक , दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे व्यावसायिक , कापडगिरणी , शिकवण्या घेणारे शिक्षक , प्रशिक्षक मीन राशीच्या कारकत्वात येतात.
१५. मीन राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे या राशिच्या लोकांचा गुरूवार हा भाग्यशाली दिवस आहे. याशिवाय या लोकांसाठी रविवार व सोमवार पण शुभ दिवस आहेत. या राशिच्या लोकांनी मंगळवारी देवाण घेवाण, प्रवास, कोणतीही महत्वाची कार्य करू नये.

१६. मीन राशिच्या लोकांना 3 7 हे अंक भाग्यशाली आहेत

१७.मीन राशिच्या लोकांचा भाग्यशाली रत्न पुष्कराज हा आहे. गुरूवारच्या दिवशी सोन्यच्या अंगठीत पुष्कराज रत्न चढवून तर्जनी बोटात घालून गुरूवारी ध्यान करावे





.